ताश्कंद करार १० जानेवारी १९६६

१० जानेवारी १९६६ : भारत व पाकिस्तान यांच्यात ’ताश्कंद करार’ झाला.

काय आहे हा ’ताश्कंद करार’ ? त्याबाबत लेखक मो. ज्ञा. शहाणे ह्यांनी ‘मराठी विश्वकोशा’त विस्तृतपणे माहिती दिली आहे. खाली देतोय !

भारत आणि पाकिस्तान यांमध्ये रशियातील ताश्कंद येथे १० जानेवारी १९६६ रोजी झालेला करार. भारतावरील पाकिस्तानी आक्रमणामुळे ५ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर १९६५ पर्यंत झालेल्या युद्धाची समाप्ती या कराराने झाली. भारताचे महामंत्री कै. लालबहादूर शास्त्री व पाकिस्तानचे राष्ट्रपती अयुबखान यांच्यामध्ये सोव्हिएट महामंत्री कोसिजिन यांच्या मध्यस्थीने ४ जानेवारी १९६६ पासून वाटाघाटी होऊन १० जानेवारीस नऊ कलमी करारावर उभय नेत्यांनी सह्या केल्या. या करारान्वये दोन्ही देशांनी संयुक्त राष्ट्र–सनदेप्रमाणे परस्परांशी स्नेहपूर्ण शेजारसंबंध निर्माण करण्याची व परस्परविरुद्ध सैन्यबळाचा उपयोग न करता, आपापसांतील तंटे शांततामय मार्गाने सोडविण्याची हमी देण्यात आली. २५ फेब्रुवारी १९६६ च्या आत आपापली सैन्ये ५ ऑगस्ट १९६५ च्या स्थानावर परत घेण्याचे मान्य करण्यात आले.
यांशिवाय करारातील इतर कलमे पुढीलप्रमाणे आहेत :
* एकमेकांच्या अंतर्गत काराभारात ढवळाढवळ न करणे.
* एकमेकांच्या विरुद्धच्या प्रचारास आळा घालणे.
* एकमेकांचे राजदूत पुनश्च स्थानापन्न करून १९६१ च्या व्हिएन्ना कराराप्रमाणे त्यांच्या सुरक्षिततेची व्यवस्था करणे.
* एकमेकांमधील आर्थिक व व्यापारी संबंध, दळणवळण व सांस्कृतिक देवाणघेवाण यांचे पुनरुज्जीवन करणे व अस्तित्वात असलेल्या कराराची अंमलबजावणी करणे.
* युद्धकैद्यांची अदलाबदल करणे.
* उभयदेशांतील लोकांना मोठ्या संख्येने देशत्याग करावा लागणार नाही, अशी परिस्थिती निर्माण करणे आणि युद्धकाळात उभयदेशांनी एकमेकांची जी मालमत्ता व परिसंपत्ती ताब्यात घेतली असेल, ती परत करण्यासाठी वाटाघाटी करणे.
* अत्युच्च व इतर स्तरांवर परस्परांच्या हितसंबंधाच्या प्रश्नावर वेळोवेळी विचारविनिमय करणे.

या करारानंतर लगेच भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे हृदयविकाराच्या झटक्याने (?) ताश्कंद येथेच निधन झाले.