उर्दू भाषेमध्ये जामियाचा अर्थ आहे – विद्यापीठ आणि मिलिया म्हणजे राष्ट्रीय.
आज दिल्लीत असणारं जामिया मिलिया इस्लामिया स्थापनेच्या सुरुवातीच्या काळात अलिगढमध्ये होतं.
ब्रिटीश राजवटीमध्ये पाश्चिमात्य शिक्षणाचा विरोध करण्यासाठी तसंच स्वातंत्र्य संघर्षासाठी सगळ्यांना एकत्र करण्याच्या उद्देशानं 22 नोव्हेंबर 1920 ला अलिगढमध्ये जामिया मिलिया इस्लामियाची स्थापना करण्यात आली.
स्वातंत्र्यसैनिक मौलाना महमूद हसन यांनी या विद्यापीठाचा पाया रचला. महात्मा गांधीही यासाठी प्रयत्नशील होते.
हकीम अजमल खान हे या विद्यापीठाचे पहिले चॅन्सलर बनले. महात्मा गांधींनी अल्लामा इक्बाल यांना व्हाईस चॅन्सलर करण्याचा प्रस्ताव मांडला होता, पण त्यांनी तो स्वीकारला नाही. त्यामुळे मग मोहम्मद अली जौहर यांना पहिले व्हाईस चॅन्सलर बनवण्यात आलं.
स्थापना झाल्यानंतर ब्रिटीश राजवटीच्या काळात असे काही राजकीय पेच उभे राहिले, की स्वातंत्र्य संग्रामाच्या संघर्षात जामिया टिकाव धरणार नाही, असं वाटू लागलं. पण अनेक संकटं येऊनही या विद्यापीठाने आपलं अस्तित्त्व टिकवून ठेवलं.
जामिया मिलिया इस्लामियामध्ये इतिहासाचे प्राध्यापक असणारे रिझवान कैसर सांगतात, “1920 साली चार मोठ्या संस्थांची स्थापना झाली. जामिया मिलिया इस्लामिया, काशी विद्यापीठ, गुजरात विद्यापीठ आणि बिहार विद्यापीठ.”
“राष्ट्रवाद, ज्ञान आणि स्वायत्त संस्कृती यावर जामियाचा पाया रचण्यात आला. एक शैक्षणिक संस्था म्हणून जामिया हळूहळू वाढत गेली. जामियाने नेहमीच स्वातंत्र्याची पाठराखण केली असून या मूल्यांचं कायम पालन केलं आहे.”
“असहकार चळवळ आणि खिलाफत आंदोलनाच्या वेळी जामिया मिलिया इस्लामियाची भरभराट झाली. पण 1922 मध्ये असहकार आंदोलन आणि नंतर 1924 मध्ये खिलाफत चळवळ मागे घेण्यात आली आणि जामियाचं अस्तित्व धोक्यात आलं,” असं कैसर सांगतात.
या आंदोलनांकडून जामियाला मिळणारं अर्थसहाय्य बंद झालं. जामियाची संकटं वाढायला लागली.
गांधीजींचा जामियाला पाठिंबा
गांधीजींना जामिया मिलिया इस्लामिया कोणत्याही परिस्थितीत सुरु ठेवायचं होतं. गांधीजींच्याच मदतीने हकीम अजमल खान, डॉ. मुख्तार अहमद अन्सारी आणि अब्दुल मजीद ख्वाजा यांनी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ 1925 मध्ये अलिगढहून दिल्लीच्या करोल बागेत हलवलं, असं जामिया मिल्लिया इस्लामियाचे जनसंपर्क अधिकारी अहमद अजीम सांगतात.
गांधीजींनी त्यावेळी म्हटलं होतं, “जामिया सुरू राहिलंच पाहिजे. जर तुम्हाला आर्थिक चिंता असतील तर मी यासाठी हातात कटोरा घेऊन भीक मागायलाही तयार आहे.”
गांधीजींच्या या वक्तव्यामुळे जामियाशी संबंधित लोकांचं मनोधैर्य वाढलं. गांधीजी निधी उभारण्याचा प्रयत्न करत होते पण ब्रिटीशकाळात कोणत्याही संस्थेला जामियाची मदत करून स्वतःसाठी अडचणी निर्माण करून घ्यायच्या नव्हत्या.
शेवटी जामियाला दिल्लीत आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांनीच एक दौरा केला आणि सामूहिक प्रयत्नांनी ही संस्था टिकवून ठेवली.