मिशन-यांचे आक्रमण एका बाजूने सुरू असताना नवशिक्षित मंडळींनी दर्पण, प्रभाकर यांसारखी वृत्तपत्रे, स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी, गुजराती व मराठी ज्ञानप्रसारक सभा यांसारखे उपक्रम सुरू करून लोकशिक्षणाचे कार्य आरंभिले. त्याचबरोबर समाजातील विचारी वर्ग रूढ धर्मातील दुष्ट व वेडगळ समजुतींमुळे समाजाचे कसे नुकसान होत आहे हे ध्यानात घेत होता.
विशेषतः स्त्रियांवर होणारा अन्याय व जाती-जतींमधील उच्चनीच भाव, सोवळेपणा ह्यामुळे आपल्या समाजचे कसे नुकसान होत आहे हे ध्यानात घेत होता.
हे व या प्रकाचे विचार विशेषतः दादोबा पांडुरंग तर्खडकर, राम बाळकृष्ण जयकर, डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खडकर, तुकाराम तात्या पडवळ, बाळा भाऊ शिंत्रे, लक्ष्मणशास्त्री हळबे, भिकोबा लक्ष्मण चव्हाण वगैरे त्या वेळच्या कर्तबगार गृहस्थांच्या मनात घोळत असत. ह्या सुमारास पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा व राम बाळकृष्णांच्या भेटीचा योग मुंबई शहरामध्ये आला.
समाजाची सर्वांगीण उन्नती व्हावी, याबद्दलची ईश्वरचंद्राची तळमळ, त्यांची विद्वत्ता व सत्यनिष्ठा यांचा राम बाळकृष्णांच्या मनावर अत्यंत इष्ट परिणाम घडला. पंडित ईश्वरचंद्र हे महर्षी देवेन्द्रनाथांच्या तत्त्वबोधिनी सभेचे सभासद होते.
पंडित ईश्वरचंद्र यांचे राम बाळकृष्ण आणि इतर मंडळींसमवेत ब्राह्मसमाजाविषयी बोलणे झाले असण्याची शक्यता आहे.
कलकत्त्यातील ब्राह्मसमाजाप्रमाणे मोठी नसली तरी अल्प प्रमाणावर आपण येथे चळवळ सुरू करावी असा निश्चय करून ह्या मंडळींनी राम बाळकृष्णांसमवेत १८४० च्या सुमारास ‘परमहंस मंडळी’ नावाची संस्था स्थापन केली.
प्रथमतः ही मंडळी गुप्त होती. प्रकटपणे समाजाला न रूचणा-या गोष्टींसंबंधी चळवळ करण्याला हा काळ अनुकूल नाही असे समजून परमहंस मंडळीचे काम गुप्त ठेवण्यात आले. मूर्तिपूजेचा निषेध, एकेश्वरी मताचा पुरस्कार व जातिभेदाचा उच्छेद हे परमहंस मंडळीचे मुख्य उद्देश होते. जातिभेद मोडल्याची साक्ष म्हणजे पावरोटी सर्वांसमक्ष खाणे. सभेस प्रारंभ होताना व अखेरीस देवाची प्रार्थना म्हणण्याचा प्रघात असे.
दादोबा पांडुरंगांनी लिहिलेला हस्तलिखित स्वरूपातील ग्रंथ सभासदांना वाचावयास देत असत. कोणताही एक धर्म ईश्वरद्त्त नाही असे त्यामध्ये विवेचन केले होते. दादोबा पांडुरंग यांनी ‘पारमहंसिक ब्राम्ह्यधर्म’ नावाचे छोटे पद्यमय प्रकरण लिहिले होते व त्यामध्ये ईश्वरभक्ती व भूतद्या, भक्ष्याभक्ष्य विचार इत्यादी बाबींसंबंधी विवेचन केले होते.
परमहंस मंडळींच्या शाखा मुंबईच्या बाहेर पुणे, अहमदनगर, सातारा, बेळगाव, रत्नागिरी इत्यादी ठिकाणी निघाल्या व एकंदर सभासदसंख्या हजारापर्यंत गेली. परंतु कोणा एका नविन सभासदाने मंडळींचे दप्तर लांबविले.
सभासदांची नावे प्रसिद्ध केली व सभेच्या हेतूचा विपर्यास करून टीका केली. ही सभासदमंडळी अमुक एक दिवशी ख्रिस्ती होणार अशी भुमका उठविली. याचा परिणाम म्हणून लोकांमध्ये सभासदांबद्दल संशयाचे वातावरण निर्माण झाले.
सभासदांची उपस्थिती रोडावली व हळूहळू परमहंस सभेचे काम बंद झाले.
-विठ्ठल रामजी शिंदे