शिवराम जानबा कांबळे

दलितांचे कैवारी

 

गोपालबाबांच्या विचारांची प्रेरणा घेऊन अस्पृश्योद्धाराची पालखी पुढे एका तरण्याबांड युवकाने खांद्यावर वाहिली. अस्पृश्योद्धार ह्या शब्दाला आर्य आणि अनार्य ह्याची सांगड देणारा पहिला दलित हितचिंतक म्हणून शिवराम जानबा कांबळे यांना मान द्यावा लागेल..

 

संघटनात्मक कार्य करून हिंदू #धर्मपोशिंदे व ब्रिटिश सरकारला वेळोवेळी अस्पृश्यांच्या प्रश्नांची जाणीव करून दिली. लेखन, वाचन, चिंतन आणि समाजकार्य अशी त्यांच्या कार्याची चतुः सूत्री सांगता येईल.

 

‘अस्पृश्यता हा मानवी जीवनावरील एक कलंक आहे’, असे गांधीजी म्हणाले. #महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातिभेदाच्या निर्मूलनासाठी अवघे आयुष्य वेचले. #राजर्षी शाहू आणि #सयाजीराव महाराज यांनी आपल्या कारकिर्दीत क्रांतिकारक निर्णय घेतले आणि या महाराष्ट्राला नवा विचार दिला. #कर्मवीरांनी ज्ञानाची गंगा प्रत्येकाच्या झोपडीपर्यंत नेली. अशा या दीन-दलितांना, आपल्या उद्धारासाठी आपणच कंबर कसली पाहिजे, असा विचार देणारी भारतातील पहिली सभा घेतली ती शिवराम जनाबा कांबळे यांनी!

 

साधुसंतांनी ज्याबद्दल देवाकडे गाऱ्हाणी घातली, ती अस्पृश्यता नष्ट व्हावी आणि वेशीबाहेरच्या या लोकजीवनात शिक्षणाची पहाट व्हावी, यासाठी दि. २४ नोव्हेंबर १९०२ रोजी शिवराम जनाबा कांबळे यांनी ५१ गावांतील १५८८ अस्पृश्यांना #सासवड गावी एकत्र आणले. मोठी सभाच भरवली, महारांना लष्कर, पोलीस खात्यात प्रवेश द्यावा, त्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणाची विनामूल्य सोय करावी, असा ठराव संमत केलेला अर्ज १५८८ व्यक्तींच्या अंगठे, स्वाक्ष-यांसह इंग्रज सरकारला सादर केला होता.

 

अस्पृश्योद्धाराच्या कार्याला संघटनात्मक बळ देण्यासाठी त्यांनी ” श्री शंकर प्रासादिक सोमवंशीय हितचिंतक मित्र” नावाचे संघटन उभा केले. त्याचसोबत “सोमवंशीय मित्र” नावाचे #मासिक काढले. या मासिकाद्वारे दलित समाजातील अनेक रूढी व अनिष्ट परंपरेवर घणाघाती टीका त्याकाळी कांबळे यांनी केलेली आहे. “सोमवंशीय मित्र” मासिकामुळं दलित समाजातील पहिले संपादक होण्याचा मान सुद्धा शिवराम जाणबा कांबळे यांच्याकडे जातो. त्यापूर्वी म्हणजे शिवराम जानबा कांबळे यांच्यापूर्वी

किसन फागू बंदसोडे यांनी तीन वृत्तपत्र काढल्याचे म्हटले जाते. त्यात 1901 मधील ‘मराठी दीनबंधू’ , 1906 मधील ‘अंत्यज विलाप’ आणि 1907 मधील ‘महारांचा सुधारक’ यांचा समावेश होतो. परंतु ही तीनही पत्र प्रकाशित झाली किंवा नाही याची माहिती मिळत नाही. त्यामुळेच शिवरामजी आद्य ठरतात.

 

सामाजिक प्रश्‍नांचे हे रण प्रामुख्याने #पांढरपेशांपुरतेच मर्यादित होते. बहुजन समाज आणि त्या पलिकडील असलेला दलित वर्ग त्यांच्या सामाजिक तसेच अन्य प्रश्‍नांची जाणीवही या लोकांना झालेली नव्हती. याला प्रकाशित करण्याचं काम शिवरामांनी केलं. ह्याच उत्तम उदाहरण बाबांच्या शब्दांत देता येत,

“ज्या प्रमाणेआ आगबोटीतबसून प्रवास करणार्‍या उतारुने जाणूनबूजून इतरांचे नुकसान करावे म्हणून म्हणा किंवा आपल्या विनाशक स्वभावामुळे म्हणा जर का इतरांच्या खोलीत छिद्र पाडले तर सर्व बोटी बरोबर त्यालाही आधि किंवा मागाहून जलसमाधी घ्यावी लागणार आहे. त्याचप्रमाणे एका जातीचे नुकसान केल्याने, अप्रत्यक्ष नुकसान करणार्‍या जातीचेही नुकसान होणार, यात बिलकूल शंका नाही.”

 

धर्मग्रंथानी अस्पृश्यांना सदैव अस्पृश्य राहायला भाग पाडले असं त्यांचं थेट पण परखड मत होतं. त्यांनी अस्पृश्य लढ्याला आर्य आणि अनार्य ह्या संघर्षाची बाजू दिलेली होती. त्यांच्या नुसार ह्या देशातील अस्पृश्यांच्या दुरावस्थेला जात व्यवस्था कारण असून तिचे निर्माते आर्य लोक आहेत. अस्पृश्यांच्या मनात #आत्मउन्नती ची जाणीव निर्माण व्हायला हवी म्हणून ते आर्य-अनार्य असा इतिहास कथन करत. त्यांच्या मते इतिहास हे प्रबोधनाचे प्रभावी हत्यार होते.