बाबर – Babar Mughal

 

बाबर : (१४ फेब्रुवारी १४८३ – २६डिसेंबर १५३॰).

हिंदुस्थानातील मोगल सत्तेचा संस्थापक व दिल्लीचा पहिला मोगल बादशाह. पूर्ण नाव जहीरुद्दीन मुहम्मद बाबर.

वडिलांचे नाव उमरशेख मिर्झा आणि आईचे कुत्लघ निगार खानम वडिलांकडून तो तैमूरलंग तुर्काचा पाचवा वारस, तर आईकडून चंगीझखान मोगलांचा वंशज होता.

त्याचा जन्म फर्घाना (कझाकस्तान) येथे झाला. अकरा वर्षांचा असतानाच त्याचे वडील वारले व तो फर्घाना प्रांताचा राजा झाला. सुरुवातीपासून त्याला त्याच्या आप्तेष्टांच्या कट्टर विरोधास तोंड द्यावे लागले. मध्य आशियात साम्राज्य स्थापण्याच्या महत्त्वाकांक्षेने त्याने दोन वेळा आपल्या पूर्वज्यांनी राजधानी समरकंद जिंकली पण दोन्ही वेळा ती त्याला गमवावी लागली. इतकेच नव्हे, तर फर्घान्यासही त्यास मुकावे लागले. परिणामत: मध्य आशिया सोडून त्याने १५॰४ साली काबूल जिंकले.

१५११ साली पुन्हा त्याने इराणच्या शाहच्या मदतीने समरकंद व फर्घाना घेतले पण उझबेक नेता उबैदुल्लाखान याने दोन्ही परत घेतले (१५१२).

१५२६ पर्यंत बाबर काबूलला होता. त्या काळात त्याने शाह बेग अर्घुनकडून कंदाहार घेतले. (१५१९-२४) दरम्यान बाबरने हिंदुस्थानावर चार स्वाऱ्या केल्या पण त्या निर्णायक ठरल्या नाहीत. १५२६ साली पानिपत येथे दिल्लीचा त्या वेळेचा सुलतान इब्राहिमखान लोदीबरोबर झालेल्या लढाईत त्याला तोफखान्यामुळे यश मिळाले. नंतर त्याने दिल्ली व आग्रा घेतले. याच सुमारास ग्वाल्हेरच्या राजाकडून त्याला प्रख्यात कोहिनूर हिरा भेट म्हणून मिळाला.

बाबर हिंदुस्थानात कायमचा राहणार असल्याचे समजल्यावर मेवाडचा राण संग्रामसिंह याने त्याच्याशी मुकाबला करण्याचे ठरविले. आग्र्याच्या पश्चिमेस सु. ६० किमी. अंतरावर खानुवाच्या मैदानावर दोघात तुंबळ युद्ध झाले. बाबरने मद्य सोडल्याची व मुसलमानांवरील नमधा कर रद्द केल्याची घोषणा करून एक स्फूर्तिदायक भाषण केले. त्यामुळे सैन्याचे मनोधैर्य वाढले.

अखेर बाबरचा विजय झाला (१५२७). नंतर त्याने चंदेरीच्या मेदिनीरायाला शरण आणले, अयोध्येचा अफगाण उमराव बिब्बनचा पराभव केला व गंगा व गोग्रा यांच्या संगमाजवळील धाग्रा येथे नुसरतशाहच्या झेंड्याखाली एकत्र आलेल्या अफगाणांना पराजित केले (१५२९).

त्यानंतर त्याने गाझी हे बिरुद धारण केले. त्याच्या राज्याचा विस्तार मध्य आशियातील अमूदर्या नदीपासून पूर्वेस बिहारपर्यंत व उत्तरेस हिमालयापासून दक्षिणेस माळवा-राजस्थानपर्यंत झाला. सततच्या युद्धांमुळे तसेच दारूच्या अतिसेवनामुळे अखेरच्या दिवसांत तो नेहमीच आजारी असे.

हुमायून व हिंदाल यांपैकी ज्येष्ठ मुलगा हुमायून याने आपल्यानंतर तख्तावर बसावे, असे त्याने शेवटच्या आजारात सुचविले. मध्ययुगीन काळातील बाबर हा अत्यंत बुद्धिमान, रसिक, मुत्सद्दी व कर्तबगार राजा समजला जातो. हिंदुस्थानात राज्य स्थापण्याचा प्रयत्न त्याच्या पूर्वजांना जमला नाही. तो बाबरने आपल्या पराक्रमाने प्रत्यक्ष कृतीत आणला. सततच्या लढायांमुळे त्याला प्रशासनात सुधारणा करण्यास पुरेसा अवधी मिळाला नाही तथापि एक कुशल सेनापती आणि मोगल साम्राज्याचा संस्थापक म्हणून इतिहासात त्याचे नाव अजरामर झाले.

त्याला सृष्टिसौंदर्याची आवड होती. तो विद्वान व कलेचा भोक्ता होता.

तुर्की व फार्सी भाषांत त्याने काही कविता केल्या होत्या. तुर्की भाषेत त्याने दीवान हा काव्यसंग्रह रचला आणि मसूनवी हे उपदेशात्मक खंडकाव्य मुबय्यिन या नावाने लिहिले. तुझक-इ-बाबरीहे त्याचे तुर्की भाषेतील आत्मचरित्र ऐतिहासिक दृष्टया महत्त्वाचे आहे. तो कट्टर सुन्नी पंथी मुसलमान असला, तरी धर्मवेडा नव्हता. हुमायून यास कोणाच्याही धर्मात हस्तक्षेप न करण्याचा उपदेश त्याने दिला. इतर जातीजमातींशी सलोख्याने व उदारतेने वागण्याचा त्याचा उपदेश होता.

संदर्भ : 1. Gascoigne, Bamber, The Great Moghuls, London, 1976.

            2. Lamb, Harold, Babur the Tiger, London, 1962.

            3. Majumdar, R.C. Ed. The Mughal Empire, Bombay, 1974.