खान अब्दुल गफ्फारखान

खान अब्दुल गफ्फारखान – सरहद्द गांधी असंही म्हटलं जातं.

गफ्फारखान पेशावरचे. खरं तर त्याही पलिकडचे.
म्हणजे ड्यूरंड रेषेच्या पलीकडचे. ड्यूरंड रेषा आज अफगाणिस्तान आणि पाकिस्तानची सरहद्द आहे, अर्थात पाकिस्तानने ठरवलं म्हणून. अफगाणिस्तानला ती मान्य नाही. असो.
तर गफ्फारखान स्वातंत्र्यलढ्याशी जुळले गेले अल हिलाल ह्या वर्तमानपत्रामुळे. हे वर्तमानपत्र निघायचं कोलकत्याहून. त्याचे संपादक होते मौलाना अबुल कलम आझाद.

गफ्फारखानांच्या वडलांना असत्य बोलणं म्हणजे काय हेच माहीत नव्हतं. तोच संस्कार गफ्फारखानांवर झाला. बालपणापासून ते सत्यवचनी होते.
गफ्फारखानांनी काढलेल्या संघटनेचं नाव होतं– खुदाई खिदमतगार (ईश्वराचे सेवक).
गफ्फारखानांनी पठाणांना अहिंसक लढाईसाठी सज्ज केलं. गांधीजींनी हे पाह्यलं तेव्हा ते आश्चर्यचकीत झाले. कारण पठाणांमध्ये सूड घेणं हे धर्मकृत्याएवढं पवित्र मानलं जायचं.

गफ्फारखानांनी पठाणांचा इतिहास पाणिनी, गौतम बुद्ध ह्यांच्यापर्यंत नेऊन भिडवला होता. ते स्वतः ईश्वरनिष्ठ आणि पापभिरू होते. तीच शिकवण त्यांनी पठाणांना दिली.
पठाणांच्या घराघरात बंदुक असायची. हे पठाण गफ्फारखानांच्या शब्दाखातर शस्त्रत्याग करून अहिंसक लढ्यामध्ये सामील झाले.
साबरमतीच्या आश्रमाचं नाव होतं सत्याग्रह आश्रम. कारण सत्याग्रही तयार करण्यासाठीच त्या आश्रमाची स्थापना झाली होती.
मिठाच्या सत्याग्रहासाठी गांधी या आश्रमातूनच निघाले. त्यावेळी त्यांनी म्हटलं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच मी या आश्रमात परत येईन.
त्यामुळे मिठाच्या सत्याग्रहानंतर राह्यचं कुठे हा प्रश्न गांधींजींपुढे होता. त्यावेळी जमनालाल बजाज ह्यांनी त्यांना म्हटलं वर्धेला चला. पण ते तर शहरच होतं त्यावेळी.
म्हणून बजाज यांनी त्यांचं मालगुजारीचं गाव– शेगाव, गांधींजींना दान केलं. त्याचं नामांतर सेवाग्राम असं करण्यात आलं.
नेमक्या त्याच वेळी गफ्फारखानांनाही ब्रिटीश सरकारने वायव्य सरहद्द प्रांतातून हद्दपार केलं होतं. गांधीजी त्यांना म्हणाले, तुम्ही माझ्यासोबतच राहा.
गफ्फारखानांची अडचण अशी होती की ते मांसाहारी होते. गांधीजी म्हणाले, आश्रमाच्या नियमानुसार आश्रमात मांसाहार शिजवायला बंदी आहे पण खायला नाही, तुमच्यासाठी आश्रमाबाहेर मांसाहार शिजवण्याची व्यवस्था करतो. गफ्फारखान सेवाग्रामला राह्यले. बापू कुटीमध्ये सर्व आश्रमवासी राहात असत. गफ्फारखान सात फूट उंच होते. व्हरांड्यात प्रवेश करताना त्यांना वाकावं लागे. गांधींजींना ते ठीक वाटलं नाही. त्यांनी सुताराला बोलावून पायर्‍यांच्या वरची पाखं उंच करून घेतली.

बादशहा खान ही पदवी पठाणांनी दिली होती. गफ्फारखान उतमानझई जमातीचे होते. पठाणांमधील ही अल्पसंख्य जमात. तरिही सर्व पठाणांनी ही पदवी त्यांना दिली. स्वातंत्र्यासंबंधातील चर्चा, वाटाघाटी सुरू झाल्या त्यावेळी गफ्फारखान गांधींजींसोबत दिल्लीच्या सफाई कामगारांच्या वस्तीत राहात. मुस्लिम लीगच्या द्विराष्ट्रवादाला गफ्फारखानांचा विरोध होता. पण वायव्य सरहद्द प्रांत पाकिस्तानात गेला. त्यावेळी गफ्फारखान गांधींजींना म्हणाले, तुम्ही आम्हाला लांडग्याच्या तोंडी दिलं. गांधीजी व्यथित झाले पण इलाज नव्हता.

गफ्फारखान पाकिस्तानात गेले. जिना त्यांना म्हणाले आपल्याला सेक्युलर राष्ट्र निर्माण करायचं आहे. त्यासाठी तुमचं सहकार्य हवं. गफ्फारखान म्हणाले ठीक आहे. परंतु अल्पावधीत त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. त्यानंतर अनेक वेळा पाकिस्तानात त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. दरम्यानच्या काळात पाकिस्तानी सरकारने खुदाई खिदमतगारांना दडपून टाकलं. त्यांना एक तर तुरुंगात खितपत पडाव लागलं किंवा त्यांचं शिरकाण करण्यात आलं. बादशहा खान कमालीचे व्यथित झाले.
स्वातंत्र्य आंदोलनात, स्वतंत्र पाकिस्तानात त्यांना कारावासात आणि नंतर हद्दपारीचं जीवन जगावं लागलं. त्यांच्या सर्व सहकार्‍यांना व अनुयायांना टिपून मारण्यात आलं.

गांधी जन्मशताब्दी वर्षाचं उद्‍घाटन करण्यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी गफ्फारखानांना निमंत्रित केलं. त्यावेळी संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर भाषण करताना गफ्फारखानांनी भारत सरकारची हजेरी घेतली. तुम्ही गांधींजींना विसरून गेले आहात असंच त्यांनी भारताला सुनावलं.
गांधी जन्मशताब्दी वर्षात अहमदाबादमध्ये हिंदु-मुसलमान दंगा सुरु झाला. शांतता प्रस्थापित करण्यासाठी बादशहा खान अहमदाबादला रवाना झाले. ट्रेनने. वस्त्या-वस्त्यांतून फिरताना पोलीस त्यांच्यासोबत असायचे. निवास स्थानीही पोलीस होतेच. गफ्फारखानांनी पोलीस अधिकार्‍य़ाला बोलावून विचारलं, मला अटक केली आहे का….
तो टरकला, नाही आपल्या संरक्षणासाठी आम्हाला सूचना देण्यात आल्या आहेत, असं त्याने सांगितलं. संरक्षण म्हणजे नजरकैदच असते, असं गफ्फारखानांनी सुनावलं आणि सर्व पोलीसांना हटवण्याची विनंती केली.