बाळशास्त्री जांभेकर

बाळशास्त्री जांभेकर -पत्रकार दिन

आचार्य अत्रे यांनी त्यांना ‘राष्ट्रजागृतीचे अग्रदूत’ म्हटले आहे.

एल्फिन्स्टन यांनी 21 ऑगस्ट 1822 रोजी मुंबई येथे दि बॉम्बे नेटिव्ह स्कूल, बुक अँड स्कूल सोसायटी नावाची शिक्षण संस्था काढली. त्या संस्थेच्या शाळेत बाळशास्त्रींनी प्रवेश घेतला.. शिक्षणाशिवाय, विशेषत: पाश्चात्य देशांतील आधुनिक ज्ञानाशिवाय तरणोपाय नाही ही बाळशास्त्रींची भूमिका होती.

सतराव्या वर्षी त्यांनी ‘नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’च्या सेक्रेटरीपदासाठी अर्ज केला. त्या वेळी त्यांना संस्कृत, इंग्रजी, मराठी, उच्च गणित, भूगोल, गुजराथी, बंगाली, फारसी इतक्या विषयांत गती असल्याचे त्यांनी नमूद केले होते. .

गव्हर्नर लॉर्ड माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन 1827 मध्ये सेवानिवृत्त होऊन विलायतेला परत गेल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ मुंबई शिक्षण मंडळी यांनी त्यांच्या नावाने एल्फिन्स्टन स्कूल सुरू केले. जांभकर यांची प्रखर विद्वत्ता पाहून इंग्रज राज्यकर्त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजात त्यांची इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून नेमणूक केली. सतरा इंग्रज प्राध्यापकांच्या ताफ्यात ते एकमेव भारतीय प्राध्यापक होते. राष्ट्रीय नेते दादाभाई नौरोजी व गणिताचे प्रकांड पंडित केरूनाना छत्रे हे त्यांचे विद्यार्थी होते.

मुख्य शाळा तपासनीस (ज्यांना सुपरिंडेंटेंट संबोधित असत) असे नेमण्यात आले. त्या पदावर बाळशास्त्री जांभेकर यांनीही दक्षिण विभागातील मराठी व कानडी शाळा तपासणीचे काम, वाहतुकीची साधने उपलब्ध नसतानादेखील चार वर्षे केले म्हणून ते पहिले मराठी शिक्षण अधिकारी होते. ‘बोर्ड ऑफ एज्युकेशन’ने चांगले प्रशिक्षित अध्यापक तयार करावेत अशी बाळशास्त्रींची कल्पना होती. युरोपीयन अधिकाऱ्यांनी ती कल्पना स्वीकारली आणि आचार्य बाळशास्त्रींच्या शिफारसीने 1845 मध्ये ‘अध्यापक वर्ग’ (डी.एड., बी.एड. कॉलेज) सुरू केले गेले. त्यांचे पहिले संचालक म्हणून आचार्यांनीच काम पाहिले.

आचार्यांनी मुंबईत त्यांच्या घराशेजारी वाडा भाड्याने घेऊन पहिले विद्यार्थी वसतिगृह सुरू केले.

लोकांच्या भावना संवेदना विशाल-उदार झाल्या पाहिजेत यासाठी जांभेकर हिरीरीने काम करत. त्या विषयावर त्यांचा ‘Liberty of Sentiments’ हा लेख प्रसिद्ध आहे. त्यासाठी देशी भाषेत वृत्तपत्र असणे अत्यावश्यक आहे हे जाणून त्यांनी मराठीत पहिले वृत्तपत्र – दर्पण – सुरू केले.

बाळशास्त्री यांनी ‘दर्पण’ प्रकाशित करण्यामागील आपली भूमिका 12 नोव्हेंबर 1831 रोजी प्रॉस्पेक्ट (प्रस्ताव) या नावाने प्रकाशित केली. ‘दर्पण’चा पहिला अंक 6 जानेवारी 1832 रोजी प्रसिद्ध झाला. ते द्विभा‍षिक वर्तमानपत्र होते. एकच वेळी इंग्रजी व मराठीत निघणा-या त्‍या पत्राच्‍या पानातील दोन स्तंभात डावीकडचा स्तंभ इंग्रजी व उजवीकडच्या स्तंभात भाषांतर असे. त्‍यास एकूण आठ पाने असत. जांभेकर यांनी वाचकांची मागणी वाढू लागल्यानी ‘दर्पण साप्ताहिक’ ४ मे १८३२ पासून सुरू केले.

जांभेकर यांची संपादकीये विचारप्रवर्तक असत. ते सभ्य प्रतिष्ठित भाषेत सरकारवर सडेतोड टीका करत. ‘दर्पण’ वृत्तपत्र सुरू झाले तेव्हा ब्रिटिशांचे शासन होते आणि वृत्तपत्र नियंत्रण कडक होते ते  1835 नंतर थोडे शिथील झाले. त्यावेळी साक्षर वर्ग कमी होता. त्यामुळे वाचकांची संख्याही कमी होती. तरीही ‘दर्पण’चे त्या काळात तीनशे वर्गणीदार होते. त्या काळात ब्रिटिशांच्या नोकरीत असूनसुद्धा बाळशास्त्री यांनी सरकारला रूचो वा न रूचो, नि:स्पृहपणे विविध सामाजिक विषयांवर ‘दर्पण’मधून लेख, अग्रलेख लिहिले ते दूरदृष्टीचे आहेत.
स्त्रियांवर लादलेली बंधने, बालविवाह, विधवाविवाह, पारतंत्र्य, केशवपन यांसारख्या गोष्टींमुळे समाजरचना चुकीच्या पायावर उभी आहे . त्यातील दोष काढले नाहीत तर पिढ्यान् पिढ्या ते सर्वांना भोगावे लागेल. त्यातून समाजाचा, धर्माचा, राष्ट्राचा विकास तर होणार नाही, पण शृंखलेमुळे अवनती होईल आणि त्याला पारतंत्र्याचे, गुलामीचे कायम स्वरूप येईल हे जांभेकरांनी ‘दर्पण’मधून सांगितले. ‘दर्पण’चा शेवटचा अंक 26 जून 1840 रोजी प्रसिद्ध झाला व ते बंद करण्यात आले. त्या अंकात ‘लास्ट फेअरवेल’ हे संपादकीय लिहून त्यांनी वाचकाचा निरोप घेतला. 

पाश्चात्य विद्वत्ता व विज्ञान यांबद्दल त्यांना रास्त आदर होता पण मिशनरींच्या धर्मांतर धोरणावर त्यांनी कडाडून हल्ला चढवला.शेषाद्री प्रकरणाच्या वेळी त्यांना प्रायश्चित घ्यावे लागले.

बाळशास्त्री जांभेकर यांचा ज्योतिष व गणित या विषयांतील अधिकार फार मोठा होता. त्यांनी ‘शून्यलब्धि’ म्हणजेच Differential calculus या विषयावर मराठी भाषेतील पहिले पुस्तक लिहिले.
बाळशास्त्री जांभेकर हे मराठीतील पहिले मासिक ‘दिग्दर्शन’चे संस्थापक संपादक (1 मे 1840) देखील होते. त्याचबरोबर पहिले मराठी असिस्टंट प्रोफेसर (नोव्हेंबर 1834), ‘बॉम्बे नेटिव्ह लायब्ररी’ या मुंबईतील पहिल्या सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक (1845), नेटिव्ह इंप्रुव्हमेंट

सोसायटी या ‘लोकसुधारणा’ व्यासपिठाचे संथापक, पहिले मराठी शाळा तपासनीस (सन 1844 ते 1855), पहिल्या विद्यार्थी वसतिगृहाचे संस्थापक (1845), कुलाबा वेधशाळेचे पहिले मराठी संचालक (1845), ज्ञानेश्वरीची पहिली शिळाप्रतही (छापील प्रत) त्यांनीच 1846 मध्येह प्रसिद्ध केली.त्यांच्या फ्रेंच भाषेतील प्राविण्याबद्दल फ्रान्सच्या बादशहाकडून त्यांचा गौरव करण्यात आला होता.

बाळशास्त्रींची ग्रंथसंपदा मोठी पुस्तके : 
1. नीतिकथा,
2. सारसंग्रह,
3. इंग्लंड देशाची बखर भाग 1 आणि 2,
4. भूगोल विद्या गणित भाग,
5. बालव्याकरण,
6. भूलोकविद्येची मूलतत्त्वे (ही दोन्ही पुस्तके त्यांच्या पश्चात सुमारे पंचवीस वर्षे प्राथमिक शाळेतून पाठ्यपुस्तक म्हणून चालू होती),
7. हिंदुस्थानचा इतिहास,
8. हिंदुस्थानातील इंग्रजांच्या राज्याचा इतिहास,
9. ज्ञानेश्वरी या मौलिक श्रेष्ठ भक्तिग्रंथाचे त्यांनी मराठीत प्रथम शिळा प्रेसवर प्रकाशन केले आहे. वयाच्या अवघ्या चौतीसाव्या वर्षी काळाने त्यांच्यावर झडप घातली.