‘महाराष्ट्राच्या ठक्करबाप्पा’
जानकीबाई परशुराम आपटे चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण. समाजकार्यात पडण्यापूर्वी घरात भरपूर सोवळेओवळे असे. अशा जानकीबाई आपल्या मुलांच्या पंक्तीला हरिजन मुलांना जेवू घालू लागल्या. त्यांचे उष्टे, खरकटे व भांडी घासणे हेही रोजच्या कामाबरोबर करू लागल्या. त्यांनी ‘हिंद सेविका संघाची’ स्थापना केली. त्यात हरिजन स्त्रियांना सहभागी करून घेऊ लागल्या. हळदी-कुंकवाच्या वेळी त्यांनी यावं म्हणून स्वत: घरोघरी जाऊन हरिजन स्त्रियांना आमंत्रण देऊ लागल्या. १९३८ सालापासून त्या हरिजन वस्तीत जाऊन मुलींच्या डोक्यातील उवा काढणे, मुलांना आंघोळ घालणे, बायकांना स्वच्छतेचे महत्त्व सांगणे, साक्षरता प्रसार करणे इत्यादी कामे करीत. दलितोद्धाराचे काम पाहून लोकच त्यांना ‘महाराष्ट्राच्या ठक्करबाप्पा’ म्हणू लागले.
१९३० साली मिठाच्या सत्याग्रहाच्या प्रचारार्थ अहमदनगरला गेलेल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या कमलादेवी चट्टोपाध्याय यांचे भाषण ऐकून जानकीबाई अस्वस्थ झाल्या होत्या. सभेनंतर बेकायदेशीर मिठाची विक्री झाली. कमलादेवींच्या चळवळीला हातभार लावण्याच्या दृष्टीने स्त्रियांची संघटना बांधणे आवश्यक आहे असे त्यांच्या मनाने घेतले. नगरचे काँग्रेस कार्यकर्ते काकासाहेब गरुड यांच्या सहकार्याने त्यांनी ‘हिंद सेविका संघाची’ स्थापना केली. महिलांमध्ये देशप्रेम व पारतंत्र्याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी त्या राष्ट्रीय कार्यक्रमांचे नियोजन करू लागल्या. त्याचा परिणाम मध्यमवर्गीय स्त्रिया धीटपणे प्रभातफे ऱ्या, निदर्शने, सभांना हजर राहणे या कामांत पुढे येऊ लागल्या. १९३६ साली फैजपूर काँग्रेसच्या अधिवेशनास स्वत:चे स्वयंसेविका पथक तयार करून घेऊन जानकीबाई गेल्या होत्या. हे पथक बनविण्यासाठी रावसाहेब पटवर्धन यांनी त्यांना मार्गदर्शन केले होते. फैजपूरमध्ये दहा दिवस कार्यकर्त्यांची व्यवस्था पाहणे, नेत्यांच्या तंबूबाहेर पहारा देणे अशी महत्त्वाची कामे या स्वयंसेविकांनी पार पाडली. त्यांची शिस्त व नेटकेपणा याबद्दल पंडित नेहरूंसह सर्व नेत्यांनी जानकीबाईंच्या नेतृत्वाची व पथकाच्या शिस्तीची प्रशंसा केली.