(मार्च ११ इ.स. १८६३ – फेब्रुवारी ६ इ.स. १९३९)
हे इ.स. १८७५ ते इ.स. १९३९ या ६४ वर्षांच्या प्रदिर्घ कार्यकाळाकरिता बडोदा संस्थानाचे अधिपती होते.
बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरीता व त्यांच्या सामाजिक दातृत्वासाठी ते विशेषत्वाने ओळखले जातात.
सयाजीराव म्हणजे भूतपूर्व बडोदे संस्थानाचे अत्यंत पुरोगामी वृत्तीचे, कर्तृत्ववान संस्थानिक. मूळ नाव गोपाळ काशीराव गायकवाड.
नासिक जिल्ह्यातील कवळाणे येथे एका गरीब कुटुंबात जन्म. बडोदा संस्थानिक खंडेराव महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी महाराणी चिमणाबाई यांनी २७ मे १८७५ ला गोपाळ या १२ वर्षाच्या चुणचुणीत मुलाला बडोद्याचा राजा होणेस्तव दत्तक घेतले.
हे गोपाळराव म्हणजेच तिसरे सयाजीराव. २८ डिसेंबर १८८१ ला सयाजीरावांचा बडोदानरेश म्हणून राज्यभिषेक झाला.
गादीवर आल्याबरोबर सयाजीरावांनी आर्थिक दृष्ट्या राज्याची स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना केली.
प्रशासकीय जबाबदारीची विभागणी हे तत्त्व राज्यकारभारात लागू करून राज्ययंत्रणेत सुरळीतपणा निर्माण केला.
शेती खात्याची स्थापना (१८९०), आदिवासी मुलांसाठी सोनगढ येथे स्वतंत्र शाळा-वसतीगृह (१८९१), सक्तीचे मोफत प्राथमिक शिक्षण (१८९२), ब्राह्मणेतरांसाठी मराठीतून वेदोक्त पाठशाळा कायदा (१८९६), विधवा पुनर्विवाह कायदा (१९०२), वेठबिगारी निर्मुलन कायदा व बालविवाहबंदी कायदा (१९०४), सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा कायदा (१९०८), स्वत:च्या अधिकाराचे विकेंद्रीकरण करणारा कायदा (१९१०) अशाप्रकारचे अत्यंत दुरगामी प्रभाव निर्माण करणारे कायदे महाराजांनी आजपासून १००-१२५ वर्षांपुर्वी रयतेच्या सर्वांगीण कल्याणाकरिता निर्माण केले.
गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन उच्च शिक्षणाची सोय त्यांनी उपलब्ध केली. औद्योगिक कलाशिक्षणाकरिता ‘कलाभूवन’ ही संस्था स्थापन केली.
‘प्राच्य विद्यामंदिर’ या संस्थेच्या वतीने प्राचीन संस्कृत ग्रंथांचे संशोधन व प्रकाशन करण्यास उत्तेजन दिले. ‘श्रीसयाजी साहित्यमाला’ व ‘श्रीसयाजी बाल ज्ञानमाला’ या दोन मालांमधून उत्तम ग्रंथांची भाषांतरे प्रसिद्ध केली.
संस्थानात गावोगावी वाचनालये स्थापन केली. फिरत्या वाचनालयांचीही सोय केली. बॅंक आॅफ बरोडाची स्थापना सयाजीरावांनी १९०८ मध्ये केली.
सयाजीरावांनी त्यांचा राज्यकारभार सामंतशाहीने न चालविता लोकशाही पद्धतीच्या मुल्यांना अंगिकारक बडोदा राज्याचा विकास केला.
पारदर्शकतेच्या नावाखाली जनतेची हल्ली खिल्ली उडविली जात असताना सव्वाशे वर्षांपुर्वी या महाराजाचे प्रशासन खरोखर पारदर्शी होते हे त्यांच्या अनेक निर्णयांवरून व त्यांच्या वर्तणुकीवरून लक्षात येते. स्वत:च्या परदेश खर्चाचा संपुर्ण साद्यंत अहवाल ते मुद्रीत स्वरुपात जनतेला तपासण्याकरिता स्वयंस्फुर्तीने प्रकाशित करित.
सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरीही महत्त्वपूर्ण आहे : पडदापद्धतीबंदी, बालविवाहबंदी, मिश्रविवाह प्रोत्साहन, स्त्रियांचा वारसा, कन्याविक्रयबंदी, अस्पृश्यतानिवारण, विधवाविवाह इ. सुधारणा प्रत्यक्ष अंमलात आणल्या.
घटस्फोटासंबंधीचा कायदा सर्व भारतात पहिल्यांदाच त्यांनी जारी केला. हरिजनांसाठी अठरा शाळा काढल्या (१८८२).
म्हणूनच महात्मा गांधीनी १९३३ मध्ये येरवडा तुरूंगातुन पाठविलेल्या पत्रात महाराजांचा गौरव हरिजनांसाठी शिक्षणाची दारे उघडणारे आणि कायद्याने अस्पृश्यता दुर करणारे पहीले राजे या शब्दविशेषणांनी केलेला होता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली आणि त्यांची बडोदा संस्थानात उच्च पदावर नेमणूकही केली. सुधारणांच्या प्रत्यक्ष पुरस्कारामुळे त्यांना ‘राष्ट्रीय सामाजिक परिषदे’च्या अध्यक्षपदाचा मान मिळाला (१९०४).
संपुर्ण भारतात सयाजीराव महाराजांइतके अस्पृश्य जातीसाठी दुसऱ्या कुणीही इतके काम केले नाही असे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वक्तव्य सयाजीरावांच्या सामाजिक जाणिवेच्या उत्तुंगतेचे दर्शन घडविते.
महात्मा ज्योतिबा फुले यांचेबाबत सयाजीरावांना विशेष आदर होता. दादाभाय नौरोजी, श्री अरविंद, विठ्ठल रामजी शिंदे, रियासतकार सरदेसाई यासारख्या अनेक प्रतिभावंतांना महाराजांनी सहाय्य केले. महाराष्ट्रातील ज्ञात्या व कर्त्या पुरुषांना सयाजीरावांचे छत्र नेहमीच लाभले आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सयाजीरावांचे भाषण वाचून मागासवर्गीय मुलांच्या शिक्षणाचे काम आयुष्यभर करण्याचा संकल्प केला.
सयाजीरावांच्या द्रष्टेपणामुळे बडोदे ही कलापूर्ण प्रेक्षणीय नगरी ठरली, याचे कारण त्यांनी बांधलेल्या सुंदर वास्तू.
लक्ष्मीविलास राजवाडा, वस्तुसंग्रहालय, कलावीथी, श्री सयाजी रुग्णालय, नजरबाग राजवाडा, महाविद्यालयाची इमारत वगैरे वास्तूंनी बडोद्याची शोभा वाढविली आहे.
त्यांना प्रवासाची अत्यंत आवड होती व त्यांनी जगभर प्रवास केला. जेथे जेथे जे जे चांगले असेल, ते ते चोखंदळपणे स्वीकारून आपल्या संस्थानाची सर्वांगीण भरभराट करण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला.
लंडनला भरलेल्या पहिल्या दोन गोलमेज परिषदांनाही ते हजर होते. अनेक थोर नेत्यांशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता. भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या राष्ट्रीय आंदोलनाला त्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा होता.
ज्ञानवृद्धी, समाजसुधारणा व शिस्तबद्ध प्रशासन या सर्वच बाबतींत ते यशस्वी ठरले. ‘हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा’ या शब्दांत त्यांचे यथोचित वर्णन पंडित मदनमोहन मालवीय यांनी केले आहे. मुंबई येथे त्यांचे ६ फेब्रुवारी १९३९ ला निधन झाले.
विद्या, कला, क्रीडा आणि संस्कृतीच्या सर्व क्षेत्रांत ठसा उमटविणाऱ्या सयाजीरावांचा आज स्मृतीदिन. खऱ्या अर्थाने दुरदर्शी असणाऱ्या या राजास त्याच्या माणुसपणाच्या सदगुणामुळे विनम्र अभिवादन.